मित्राला सोडायला जात असतानाच काळाचा घाला; टेम्पोच्या कटमुळे सोलापुरातील तरुणाने गमावला जीव

सोलापूर – मित्राला सोडण्यासाठी जात असताना एका भरधाव टेम्पोने हुलकावणी (कट) दिल्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना सोमवार, दुपारी अडीचच्या सुमारास विजापूर रोडवरील मकानदार हॉटेलसमोर घडली.निसार जावेद मुल्ला (वय २२, रा. दोन नंबर झोपडपट्टी, विजापूर नाका) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र तबरेज जमीर यादगिरी (वय २३) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उभ्या कारला दिली धडक-

मिळालेल्या माहितीनुसार, निसार मुल्ला हा मजुरीचे काम करत होता. सोमवारी दुपारी तो त्याचा मित्र तबरेज याला सोबत घेऊन दुचाकीवरून सोरेगाव येथील नातेवाइकांकडे जाण्यासाठी निघाला होता. निसार दुचाकी चालवत होता, तर तबरेज पाठीमागे बसला होता. विजापूर नाका ते सोरेगाव दरम्यान जात असताना, एसआरपीएफ (SRPF) कॅम्पजवळ एका अज्ञात टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरात कट मारला. टेम्पोच्या हुलकावणीमुळे निसारचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका कारला पाठीमागून वेगाने जाऊन धडकली.

उपचारापूर्वीच मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर-

हा अपघात इतका भीषण होता की, निसारच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच बेशुद्ध पडला. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याला मृत घोषित केले. पाठीमागे बसलेला तबरेज यादगिरी हा देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृत निसारच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. कमावता आणि तरुण मुलगा गमावल्यामुळे मुल्ला कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सिव्हिल रुग्णालय परिसरात त्याच्या नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेची नोंद पोलिसांत झाली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *