सोलापूर – सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय कामात दिरंगाई, हलगर्जीपणा आणि टाळाटाळ केल्याप्रकरणी एका प्राथमिक शिक्षकाविरुद्ध सोलापूर येथील सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक ड्युटीकडे पाठ फिरवणे संबंधित शिक्षकाला महागात पडले आहे.
राष्ट्रीय कामात अडथळा आणि टाळाटाळ-
अनंत अरुणराव पाटील (शिक्षक, राष्ट्रमाता इंदिरा प्राथमिक शाळा, विडी घरकुल, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक तथा निवडणूक पर्यवेक्षक मुकेश पांडुरंग बद्दुरकर (वय ३३) यांनी सरकारतर्फे अधिकृत फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये सध्या राज्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) राबवला जात आहे. या अंतर्गत २४८-सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात शिक्षक अनंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना यादी भाग क्रमांक १६१ मधील ‘इन्यूमरेशन फॉर्म’ वाटप करणे आणि त्याचे ‘डिजिटायझेशन’ करण्याचे काम सोपवण्यात आले होते.
नोटीस देऊनही प्रतिसाद नाही-
पर्यवेक्षक बद्दुरकर यांनी ३ जुलै २०२६ रोजी कामाचा आढावा घेण्यासाठी शिक्षक पाटील यांच्याशी वारंवार फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा मोबाईल बंद होता. शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांच्या घरी चौकशी केली असता ते तिथेही अनुपस्थित असल्याचे आढळून आले. निवडणूक आयोगाच्या या प्राधान्यक्रमाच्या कामात त्यांनी खोडा घातल्याने राष्ट्रीय कामावर विपरित परिणाम झाला. या गंभीर बेजबाबदारपणाबद्दल त्यांना ८ जुलै २०२६ रोजी ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली होती, मात्र त्यांनी त्यालाही कोणताही प्रतिसाद दिला नाही व बी.एल.ओ. ॲपवरील काम अपूर्ण ठेवले.
पोलिसात गुन्हा दाखल-
मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले यांच्या आदेशानुसार अखेर सदर बाजार पोलिसांनी या प्रकरणी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक अजित शंकर लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल ज्योती नागनाथ लमतुरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.












Leave a Reply