पंढरपुरात जुन्या वादातून कॅफे चालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; १० ते ११ जणांवर गुन्हा दाखल

पंढरपूर: येथील शासकीय वसाहतीमागे असलेल्या एका कॅफे चालकावर जुन्या वादाच्या कारणावरून लोखंडी कोयत्याने आणि लाथाबुक्यांनी भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात कॅफे चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोन नामजद आरोपींसह इतर ८ ते ९ अनोळखी तरुणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना काय घडली?-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार बबन शिंदे (वय १९, रा. कोर्टी, पंढरपूर) हा देशमुख पेट्रोल पंपाच्या पाठीमागे ‘A.J. कॅफे’ नावाचे हॉटेल भागीदारीत चालवतो. ९ जुलै २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तुषार आपल्या कॅफेमधील कामगाराला घरी सोडून परत आला. तो गाडी लावून कॅफेत जात असताना, तिथे आधीच दबा धरून बसलेला आरोपी रितेश गोडसे, यश ज्ञानेश्वर अंकुशराव (रा. कोळी गल्ली) आणि त्यांच्यासोबत असलेले इतर ८ ते ९ तरुण तिथे आले.“तू मागच्या आठवड्यात यशला मारण्यासाठी राजू धोत्रेसोबत होतास, तुला लय मस्ती आली आहे का?” असे म्हणत रितेश गोडसे आणि यश अंकुशराव यांनी आपल्या कंबरेला ठेवलेले लोखंडी कोयते उपसले आणि तुषारच्या डोक्यावर व मानेवर सपासप वार करण्यास सुरुवात केली.

जीव वाचवण्यासाठी किचनमध्ये धाव, तिथेही हल्ला-

तुषारने स्वतःचा बचाव करण्यासाठी दोन्ही हात पुढे केले, ज्यामुळे त्याच्या हातावर, मनगटावर आणि पंजावर गंभीर जखमा झाल्या. हल्लेखोरांपासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तुषारने कॅफेच्या किचनमध्ये पळून जाऊन दरवाजा आतून लावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी दरवाजा जोरात ढकलून आत प्रवेश केला आणि तिथेही त्याला कंबरेवर व मांडीवर कोयत्याने मारहाण केली. कॅफेमधील फिश टँकचे टोपणही त्याच्या पाठीवर मारण्यात आले.तिथून निसटून तुषार जेव्हा शेजारील बोळातून पळत होता, तेव्हाही आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याला गाठले आणि लाथाबुक्यांनी व कोयत्याने बेदम मारहाण केली.रक्तस्त्राव झाल्यामुळे तुषार जागीच बेशुद्ध पडला.

रुग्णालयात उपचार सुरू, पोलिसांत गुन्हा दाखल-

घटनेनंतर तुषारचा मित्र श्रेयश माने आणि नातेवाईक ओंकार पवार यांनी त्याला तातडीने ट्युलीप हॉस्पिटलच्या आयसीयू वार्डात उपचारासाठी दाखल केले.पंढरपूर शहर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोपी यश ज्ञानेश्वर अंकुशराव, रितेश गोडसे आणि त्यांच्या इतर ८ ते ९ साथीदारांवर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०९(१) (खून करण्याचा प्रयत्न), ११५(२), ३५२, ३५१(३), १८९(४), १९०, १९१(३) सह शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *