करमाळा – सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व मानवी आरोग्यास अत्यंत धोकादायक असणाऱ्या अंमली पदार्थांच्या व औषधांच्या तस्करीविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. करमाळा शहरात बेकायदेशीररित्या प्रतिबंधित ‘मेफेन्टरमाइन सल्फेट इंजेक्शन’ची (Mephentermine Sulphate Injection IP) वाहतूक व विक्री करणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) रंगेहात अटक केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण १,०६,७२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
शरद विष्णू शिंदे (वय २८ वर्षे, रा. शेळगाव (क), ता. करमाळा, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अशा प्रतिबंधित आणि मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या इंजेक्शनची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अशा तस्करांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या सूचनेवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे व त्यांचे पथक करमाळा उपविभागात गस्त घालत होते.
गस्तीदरम्यान पोलीस कर्मचारी राहुल दोरकर व हरीश थोरात यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक इसम राशन चौक ते करमाळा रोडवरील ‘विघ्नहर्ता ऑटोमोबाईल गॅरेज’समोरील रस्त्यावर मोटारसायकलवरून प्रतिबंधित इंजेक्शन विकण्यासाठी येत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. थोड्याच वेळात बातमीतील वर्णनाप्रमाणे आरोपी मोटारसायकलवरून येताना दिसताच पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. पोलिसांना पाहून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पथकाने त्याला जागीच गराडा घालून ताब्यात घेतले.
आरोपीची व त्याच्या गाडीची झडती घेतली असता, त्याच्याकडे ट्रोईका (Troikaa) कंपनीचे ‘मेफेन्टरमाइन सल्फेट इंजेक्शन’चे १० बॉक्स (एकूण ५० सीलबंद इंजेक्शन व्हायल्स) सापडले. या औषधांबाबत वैध बिल किंवा डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन मागितले असता तो कोणतीही कागदपत्रे दाखवू शकला नाही. हे इंजेक्शन मानवी आरोग्यासाठी घातक असून त्याचा गैरवापर करण्याच्या उद्देशाने अनधिकृत विक्रीसाठी ते नेले जात असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी औषधांच्या बॉक्ससह त्याची स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. एमएच-४५ एआर-२८८३) आणि अँड्रॉईड मोबाईल फोन जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, १२५ आणि २७८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल मुळे, मनोज भंडारी, पंकज महिंद्रकर, सिद्राम कंटोळी, व्यंकटेश मोरे, राहुल दोरकर आणि हरीश थोरात यांच्या पथकाने बजावली.














Leave a Reply