सोलापुरात दुर्दैवी घटना: चिंचोळी एमआयडीसीत विजेचा धक्का लागून ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

सोलापूर –चिंचोळी एमआयडीसी येथील एका कंपनीत काम करत असताना विजेचा तीव्र धक्का (शॉक) लागून ४० वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी दुपारी घडली. या दुर्दैवी घटनेमुळे सोलापुरातील नई जिंदगी परिसरावर आणि मृत व्यक्तीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.निजामुद्दीन नदाफ असे मयत व्यक्तीचे नाव या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव निजामुद्दीन रसूलसाब नदाफ (वय ४०) असे आहे. ते सोलापूर शहरातील सिद्धेश्वर नगर भाग ४, नई जिंदगी येथील रहिवासी होते.

कशी घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक १६ जुलै २०२६ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास निजामुद्दीन नदाफ हे चिंचोळी एमआयडीसी येथील ‘जीपी इंडस्ट्रीज’मध्ये गाडीतील साहित्य घेऊन पायी चालत जात होते. यावेळी तिथे पाणी भरण्यासाठी लावलेल्या टिल्लू मोटरजवळून जात असताना त्यांचा संपर्क मोटारला झाला. मोटारमध्ये अचानक उतरलेल्या विजेच्या तीव्र प्रवाहामुळे त्यांना जोरदार शॉक लागला आणि ते जागीच बेशुद्ध पडले.

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली-

घटनास्थळी उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांनी तातडीने हालचाल करत निजामुद्दीन यांना उपचारासाठी सोलापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

कुटुंबाचा कर्ता पुरुष हरपला-

निजामुद्दीन नदाफ यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे. घराचा मुख्य कमावता पुरुष गेल्याने संपूर्ण नदाफ कुटुंब उघड्यावर पडले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *