पंढरपूर – आषाढी एकादशीच्या (२५ जुलै २०२६) पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) कंबर कसली आहे. यंदाच्या यात्राकाळात ५ हजार ५०० विशेष बसेस सोडण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पंढरपूर येथील आढावा बैठकीत दिली. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर, नगराध्यक्षा प्रणिता भालके यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गावागावांतून थेट बस आणि तिकीट सवलती-
भाविकांच्या सुविधेसाठी महामंडळाने ‘ग्रुप बुकींग’ची विशेष सोय केली आहे. राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्याहून अधिक भाविकांनी मागणी केल्यास, थेट त्यांच्या गावातून पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल. विशेष म्हणजे, या विशेष बस प्रवासातही शासनाच्या सर्व सवलती लागू राहतील. ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजने’अंतर्गत मोफत प्रवास, तर महिलांना ‘महिला सन्मान योजने’अंतर्गत तिकीट दरात ५० टक्के सवलत मिळणार आहे.
पंढरपुरात ४ तात्पुरती बस स्थानके-
यात्राकाळात होणारी गर्दी लक्षात घेता पंढरपूर परिसरात चंद्रभागा, भीमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग (आयटीआय कॉलेज) अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः भीमा बसस्थानकाची पाहणी करून तेथील पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण, चौकशी कक्ष, आरोग्य सुविधा आणि सीसीटीव्ही यंत्रणेची पाहणी केली.
प्रवाशांची सुरक्षितता आणि कर्मचाऱ्यांची सोय-
परतीच्या प्रवासाची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी मार्गनिहाय स्वतंत्र रांगा लावण्यात येतील. तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक व सुरक्षा रक्षक तैनात केले जातील. बसेसची अंतर्गत व बाह्य स्वच्छता राखण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
विशेष उल्लेखनीय: वारीच्या काळात रात्रंदिवस सेवा बजावणाऱ्या महामंडळाच्या सुमारे १३ हजार चालक, वाहक, यांत्रिक व पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांसाठी चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच्या खर्चातून केली आहे.












Leave a Reply