ब्रेकिंग | सोलापूर ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: २४ किलो गांजासह १३ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर – सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि सोलापूर तालुका पोलिसांनी संयुक्तपणे एक धडाकेबाज कारवाई केली आहे. नळदुर्ग-सोलापूर महामार्गावर सापळा रचून तब्बल २४ किलो ९४० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून गांजा आणि एक ॲक्टिव्हा मोटार सायकल असा एकूण १३ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.​मुन्ना अब्दुल गफुर शेख (वय ४८ वर्षे, रा. ३९० राहुल गांधी झोपडपट्टी, पाच्छापेठ, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

अशी झाली कारवाई-

​सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गांजा या अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) भिमगोंडा पाटील व त्यांच्या पथकाने नळदुर्ग ते सोलापूर महामार्गावर सापळा रचला. ​या दरम्यान, संशयित आरोपी मुन्ना शेख हा त्याच्या होंडा ॲक्टिव्हा (क्र. MH 13 EH 3759) वरून सीटवर एक प्लास्टिकचे पोते घेऊन येताना दिसला. पोलिसांनी त्याला जागीच घेरून ताब्यात घेतले.

१३ लाखांचा मुद्देमाल जप्त-

​पोलिसांनी आरोपीकडे असलेल्या पोत्याची झडती घेतली असता, त्यात उग्र वास असलेला, ओलसर हिरव्या रंगाचा पाने व बिया असलेला २४ किलो ९४० ग्रॅम गांजा आढळून आला. या गांजाची किंमत १२ लाख ४७ हजार रुपये आहे. पोलिसांनी ७० हजार रुपये किमतीची मोटार सायकल आणि गांजा असा एकूण १३,१७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि संजय जगताप, पोनि कुंदन गावडे, सपोनि भिमगोंडा पाटील, हवालदार सलीम बागवान, अजय भोसले, विजय भरले, दिपाली जाधव, सागर ढोरे-पाटील, प्रमोद शिंपाळे, किरण चव्हाण, दिलीप थोरात, अनंत चमके आणि पैगंबर नदाफ यांच्या पथकाने बजावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि कदम करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *