महिलांवर अत्याचार करणाऱ्या १९ वर्षीय सराईत गुन्हेगारा स्वप्निल एक वर्षासाठी तडीपार

सोलापूर – शहरातील बुधवार पेठ भागातील एका सराईत गुन्हेगाराविरुद्ध सोलापूर शहर पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. अवघ्या १९ वर्षांच्या वयात गंभीर गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्या स्वप्निल आकाश लिंबोळे (रा. वडार गल्ली, बुधवार पेठ, सोलापूर) याला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार (हद्दपार) करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त प्रितम यावलकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

महिलांवर अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल-

सराईत गुन्हेगार स्वप्निल लिंबोळे याच्यावर गेल्या काही वर्षांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सन २०२३ ते २०२५ या कालावधीत त्याच्यावर महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. अत्यंत कमी वयात त्याने केलेल्या या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे.

फौजदार चावडी पोलिसांचा प्रस्ताव मंजूर-

लिंबोळे याच्या गुन्हेगारी कारवायांना वेसण घालण्यासाठी फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या वतीने त्याच्या तडीपारीचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजुरीसाठी पोलिस उपायुक्तांकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावाची कायदेशीर पडताळणी करून आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, पोलिस उपायुक्त प्रितम यावलकर यांनी स्वप्निल लिंबोळे याला एक वर्षासाठी सोलापूर शहर व जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश दिले.

गुन्हेगारांना पोलिसांचा कडक इशारा

तरुण वयात गुन्हेगारीकडे वळणाऱ्या आणि शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्या घटकांवर पोलिसांची करडी नजर आहे. महिलांची छेडछाड किंवा अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, हाच संदेश या कठोर कारवाईतून सोलापूर शहर पोलिसांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *