सोलापूर: शेळ्यांना पाणी पाजवण्यासाठी विहिरीजवळ गेलेल्या एका ११ वर्षीय चिमुरडीचा पाय घसरून विहिरीत पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोलापूर जवळील आनंदनगर तांडा (मद्रे परिसर) येथे घडली आहे. इंदिया रामजी राठोड (वय ११) असे मृत बालिकेचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदिया ही मूळची विजापूर (कर्नाटक) येथील रहिवासी होती, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून ती आनंदनगर तांडा येथे आपल्या मामाच्या घरी राहत होती. रविवार, १४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास इंदिया घरासमोरील शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी विहिरीजवळ गेली होती. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने किंवा अचानक पाय घसरल्याने ती थेट विहिरीत कोसळली.
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू मुलगी विहिरीत पडल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. तिला विहिरीतून बाहेर काढून बेशुद्ध अवस्थेत तातडीने सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात तपासणीपूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पोलिसांकडून पंचनामा या घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी याप्रकरणी प्राथमिक नोंद केली असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि अधिक तपशील समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मृत इंदियाच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे. तिचे आई-वडील कर्नाटकात राहत असून, लाडक्या मुलीच्या अशा अचानक जाण्याने राठोड आणि मामाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.












Leave a Reply