सोलापूर – जवळा (ता. सांगोला) येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) एक मोठी कारवाई करत तब्बल १५ लाख १ हजार २८० रुपये किमतीचा ३७ हजार ५३२ लिटर भेसळयुक्त दुधसाठा जप्त करून जागेवरच नष्ट केला आहे. यासोबतच संबंधित डेअरीला सर्व त्रुटींची पूर्तता करेपर्यंत व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) साहेबराव देसाई यांनी दिली.मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ११ जुलै रोजी अन्न सुरक्षा अधिकारी श्री. गणेश म. कदम आणि सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी श्री. मंगेश म. लवटे यांच्या पथकाने बुरुंगेवाडी, जवळा येथील ‘मे. अंजिक्यराणा मिल्क इंडस्ट्रीज’ या ठिकाणी अचानक छापा टाकला. या तपासणी दरम्यान पथकाने दुधाचे ४ नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी घेतले आणि उर्वरित ३७,५३२ लिटर दूध जप्त केले.
तपासणीत आढळलेल्या गंभीर त्रुटी –
दूध संकलन व चिलिंग युनिटचा कोणताही वैध परवाना नव्हता.’स्पॉट टेस्ट’ (जागेवरील चाचणी) दरम्यान दुधात पाणी मिसळल्याचे स्पष्ट झाले.दुधातील एसएनएफ (SNF) चे प्रमाण विहित नियमांपेक्षा अत्यंत कमी आढळले.दूध खरेदी-विक्रीची कोणतीही पद्धतशीर नोंद ठेवली जात नव्हती.अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या ‘अनुसूची IV’ मधील स्वच्छतेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत होते.दूध हा नाशवंत पदार्थ असल्यामुळे जप्त केलेला संपूर्ण साठा जागेवरच योग्य पद्धतीने नष्ट करण्यात आला. तसेच वैध परवाना मिळेपर्यंत संबंधित आस्थापनेला व्यवसाय सुरू न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.दर धडक कारवाई अन्न व औषध प्रशासन मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे व पुणे विभागाचे सह आयुक्त दि. वा. भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी गणेश कदम आणि मंगेश लवटे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे भेसळबहाद्दरांचे धाबे दणाणले आहेत.












Leave a Reply