सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात १४ दिवसांसाठी मनाई आदेश लागू

सोलापूर – सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात शांतता, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्तालयाची हद्द वगळून संपूर्ण सोलापूर ग्रामीण भागात पुढील १४ दिवसांसाठी मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. हे आदेश दि. ०८ जुलै २०२६ रोजी रात्री ८.०० वाजल्यापासून ते २२ जुलै २०२६ रोजी रात्री ८.०० वाजेपर्यंत अमलात राहतील, अशी माहिती अप्पर जिल्हादंडाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिली.महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) अ ते फ आणि ३७ (३) अन्वये हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील समाजकंटक आणि गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींवर वेळेत प्रतिबंधात्मक कारवाई करणे पोलिसांना सोयीचे होणार आहे.

या गोष्टींवर असेल पूर्ण बंदी –

 या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग होऊ नये म्हणून अनेक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे:

  • शस्त्र बाळगणे: शस्त्रे, तलवारी, भाले, सुरे, सोटे, झेंडा लावलेली काठी किंवा शरीराला इजा पोहचवू शकेल अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगण्यास मनाई आहे.

  • विघातक पदार्थ: कोणतेही ज्वालाग्राही, स्फोटक पदार्थ किंवा दगड आणि फेकायची उपकरणे जमा करणे व वाहतूक करण्यास बंदी असेल.

  • चिथावणीखोर वर्तन: सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी करणे, असभ्य हावभाव करणे आणि ग्राम्य भाषेचा वापर करण्यास सक्त मनाई आहे.

  • भावना दुखावणारे कृत्य: विविध जाती-जमातींच्या भावना दुखावतील असे कृत्य करणे, सोंगे किंवा चिन्हे तयार करून त्यांचा प्रसार करणे आणि व्यक्ती किंवा प्रेतयात्रांचे प्रदर्शन करण्यास बंदी घातली आहे.

महत्त्वाची सूट: हा आदेश सरकारी कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती आणि जिल्हादंडाधिकारी किंवा पोलीस प्रशासनाची रीतसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींना त्यांच्या कर्तव्यादरम्यान लागू होणार नाही.

नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *