सैराट’ फेम सल्याची रुग्णालयाकडून लूट; औषधांच्या सक्तीमुळे डोळ्यात आले पाणी!

सोलापूर – ‘सैराट’ चित्रपटातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख (सल्या) सध्या एका मोठ्या कौटुंबिक आणि आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अरबाजने इन्स्टाग्रामवर एक भावूक व्हिडिओ शेअर करत वडिलांच्या उपचारासाठी चाहत्यांकडे आर्थिक मदतीची याचना केली आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये त्याने सोलापुरातील ‘नोबल’ रुग्णालय प्रशासनाच्या मनमानी कारभारावर आणि सुरू असलेल्या लुटीवर गंभीर आरोप केले आहेत.

​अरबाजने सांगितले की, त्याच्या वडिलांवर सध्या सोलापूरच्या नोबल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथे रुग्णालय प्रशासनाने त्याला तब्बल ४० हजार रुपयांची औषधं रुग्णालयाच्याच अंतर्गत असलेल्या मेडिकलमधून खरेदी करण्याची सक्ती केली. जर हीच औषधं बाहेरून घेतली असती, तर ती अर्ध्या किमतीत मिळाली असती, असा दावा अरबाजने केला आहे. हतबल झालेल्या एका मुलाची ही व्यथा पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून संबंधित रुग्णालयावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

काय सांगतो कायदा?-

अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट आदेश दिले होते की, रुग्णालयातील फार्मसीमधूनच औषध खरेदी करणे कायद्याने बंधनकारक नाही. औषधं कुठून घ्यायची, हा सर्वस्वी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचा वैयक्तिक अधिकार आहे. कोणतीही संस्था किंवा रुग्णालय अशी सक्ती करू शकत नाही.​FDA आयुक्तांच्या कडक इशाऱ्यानंतरही सोलापूरच्या या खाजगी रुग्णालयाने थेट अभिनेत्यावरच अशी सक्ती केल्याने आता प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नियम धाब्यावर बसवणाऱ्या या रुग्णालयावर FDA आता काय कायदेशीर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *