सोलापूर – शहरात सध्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहिमे अंतर्गत मतदारांना गणना प्रपत्र (एन्युमरेशन फॉर्म) वितरित करण्याची प्रक्रिया प्रशासनातर्फे राबवली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकही मतदार सुटू नये म्हणून ही मोहीम महत्त्वाची मानली जात असतानाच, सोलापूर शहरातील अनेक भागांत मात्र या मोहिमेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. संबंधित भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO – बूथ लेव्हल ऑफिसर) नागरिकांचे फोन उचलत नसल्याच्या तीव्र तक्रारी आता नागरिकांमधून समोर येत आहेत.
घरात बसून फॉर्म मिळणे दुरापास्त, नागरिक चक्रावून-
नियमानुसार, बीएलओंनी मतदारांच्या घरापर्यंत जाऊन ही गणना प्रपत्र (एन्युमरेशन फॉर्म) वितरित करणे आणि भरून घेणे अपेक्षित आहे. परंतु, सोलापूर शहरातील अनेक सोसायट्या आणि प्रभागांमध्ये अद्याप एकही अधिकारी फिरकलेला नाही.’गणना प्रपत्र’ मिळवण्यासाठी नागरिकांनाच आता बीएलओचा शोध घ्यावा लागत आहे.
तक्रारींचा पाढा: फोन ‘नॉट रीचेबल’ किंवा अनुत्तरित-
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक शाखेकडून मिळालेल्या बीएलओंच्या यादीतील क्रमांकांवर संपर्क साधला असता, बहुतांश अधिकाऱ्यांचे फोन बंद असतात किंवा ते फोन उचलत नाहीत. जर एखाद्याने चुकून फोन उचललाच, तर “उद्या दुपारी 3 च्या नंतर फोन करा तुमच्या भागात आल्यावर फोन करतो.”,किंवा तुमच्या भागात या ठिकाणी या अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. यामुळे नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
आमच्या भागात अद्याप कोणीही फॉर्म द्यायला आलेले नाही. प्रशासनाने दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता बीएलओ फोन उचलत नाहीत. लोकशाहीचा कणा असलेल्या मतदार नोंदणीबाबत जर अशी अनास्था असेल, तर नागरिकांनी दाद कोणाकडे मागायची?
इम्रान सय्यद , त्रस्त नागरिक, सोलापूर.
या गंभीर प्रकाराकडे सोलापूर जिल्हाधिकारी आणि मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन, कर्तव्यात कसुरी करणाऱ्या अशा ‘नॉट रीचेबल’ बीएलओंवर कडक कारवाई करावी आणि गणना प्रपत्र (एन्युमरेशन फॉर्म) वितरण सुरळीत करावे, अशी मागणी आता सोलापूरकरांमधून जोर धरू लागली आहे.












Leave a Reply