सोलापूर आरटीओ कार्यालयाचा सावळागोंधळ; लायसन्ससाठी नागरिक त्रस्त, लोकप्रतिनिधी लक्ष घालणार का?

सोलापूर – सोलापूर शहर उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (DYRTO) दर्जा वाढवून नुकतेच त्याचे रूपांतर प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) करण्यात आले. या निर्णयामुळे सोलापूरकर वाहनधारकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रशासकीय ढिसाळपणामुळे हा आनंद अल्पजीवी ठरला असून, सध्या हे कार्यालय सर्वसामान्यांसाठी मनस्तापाचे केंद्र बनले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून दुचाकीचे ड्रायव्हिंग लायसन्स मंजूर होऊनही नागरिकांना अद्याप ते हातात मिळालेले नाही. लायसन्स कधी मिळणार, याची चौकशी करण्यासाठी आरटीओ कार्यालयात चकरा मारणाऱ्या नागरिकांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

खिडकी क्रमांक 05 आणि 10 चा ‘फेरा’- 

अनेक तक्रारदार नागरिकांनी सांगितले की, चौकशीसाठी गेल्यास कधी खिडकी क्रमांक 05, तर कधी खिडकी क्रमांक 10 वर जाण्याचा सल्ला दिला जातो. एका खिडकीवरून दुसऱ्या खिडकीवर हेलपाटे मारूनही कोणतेही ठोस उत्तर मिळत नाही. तास न् तास रांगेत उभे राहूनही काम होत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.”कार्यालयाचा दर्जा वाढला, पण सुलभता येण्याऐवजी मनस्ताप वाढला आहे. शासनाने या कार्यालयाला प्रादेशिक दर्जा देऊन चूक तर केली नाही ना?” अशी संतप्त चर्चा सध्या सोलापूरकरांमध्ये रंगू लागली आहे.

लोकप्रतिनिधी दखल घेणार का?-

कार्यालयातील या सावळ्यागोंधळामुळे सामान्य जनता भरडली जात आहे. आता या गंभीर समस्येकडे राज्याचे मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, तसेच सोलापूरचे स्थानिक आमदार आणि खासदार लक्ष घालून नागरिकांची या त्रासातून सुटका करणार का, की आरटीओचा हा मनमानी कारभार असाच सुरू राहणार, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *