दारूचे व्यसन ठरले जीवघेणे! पाण्याच्या बॅरलमध्ये तोल जाऊन पडल्याने वृद्धाचा मृत्यू

सोलापूर – दारूच्या नशेमध्ये शेतातील वस्तीसमोर पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये तोल जाऊन पडल्याने एका ६६ वर्षीय वृद्धाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथे रविवारी (५ जुलै) सकाळी उघडकीस आली. भीमराव धोंडीबा भालेकर (वय ६६, रा. निंबर्गी, ता. द. सोलापूर) असे मरण पावलेल्या वृद्धाचे नाव आहे. ते पाटबंधारे विभागातून पाच वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते.

​पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भीमराव भालेकर हे मंद्रुप-निंबर्गी रस्त्यावरील शेतातील वस्तीवर राहत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. शनिवार, ४ जुलै रोजी रात्री ते मद्यपान करून वस्तीवर आले. त्या वेळी वस्तीवर कुटुंबातील इतर कोणीही नव्हते. दारूच्या नशेत वस्तीसमोर ठेवलेल्या पाण्याच्या बॅरलमध्ये त्यांचा अचानक तोल गेला आणि ते त्यात पडले.

खाली मुंडके अन् वर पाय…-

बॅरलमध्ये पडताना ते उलटे पडल्याने (खाली मुंडके अन् वर पाय) त्यांना बाहेर पडता आले नाही आणि पाण्यात बुडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. रविवार, ५ जुलै रोजी सकाळी त्यांचे शेजारी बाळासाहेब सलगरे यांनी भीमराव यांचे सुपुत्र दिनेश भालेकर यांना फोन करून, ‘तुझे वडील वस्तीवर कुठे दिसत नाहीत’, असा निरोप दिला.

​वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मृत घोषित-

हा निरोप मिळताच मुलगा दिनेश याने तातडीने शेतातील वस्तीकडे धाव घेतली. तिथे पाहिले असता वडील भीमराव हे पाण्याच्या बॅरलमध्ये मृत अवस्थेत आढळून आले. यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून तातडीने मंद्रुप येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे निंबर्गी आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *