Ashadhi Wari 2026: वारकऱ्यांसाठी पहिल्यांदाच एअर ॲम्बुलन्स सुविधा

पंढरपूर, दि. ४ : आषाढी वारीसाठी पंढरपुरात येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना तात्काळ आणि गतिमान वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी यावर्षीपासून पहिल्यांदाच नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत ‘एअर ॲम्बुलन्स’ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीनिमित्त आयोजित प्रशासकीय व लोकप्रतिनिधींच्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते.आरोग्यमंत्री म्हणाले की, वारकरी घराबाहेर पडल्यापासून ते वारी संपवून सुरक्षित परत पोहोचेपर्यंत त्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी आरोग्य विभाग घेणार आहे. या वारीमध्ये ‘आरोग्य संपन्न वारी’ व ‘वारी सहाय्य’ या डिजिटल मोहिमेद्वारे प्रत्येक आरोग्य कर्मचारी व आशा सेविकांच्या मदतीने भाविकांना तात्काळ मदत दिली जाईल. तसेच पालखी मार्गावरील व शहरातील खाजगी रुग्णालयांमधील १० टक्के खाटा वारकऱ्यांसाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.

आरोग्य सुविधेचा भव्य आराखडा-

पालखी मार्गावर एकूण ३५३ रुग्णवाहिका, ४३ ठिकाणी सुसज्ज आयसीयू (ICU) सुविधा आणि प्राथमिक उपचारांसाठी १५६ ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उभारण्यात येणार आहे. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांमध्ये १६ आयसीयू कक्ष व १७ तात्पुरते दवाखाने असतील. तसेच २१५ फिरते आरोग्य दूत, ३,०८७ वैद्यकीय कर्मचारी आणि ३०२ विशेष तज्ज्ञ डॉक्टर वारीत तैनात राहतील. तीन दिवसीय भव्य आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात येणार आहे.

या बैठकीत आमदार समाधान आवताडे, राजू खरे, अभिजीत पाटील व नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी रुग्णालयांचे सक्षमीकरण, स्वच्छता आणि वारीनंतरच्या संसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंधात्मक उपायांबाबत महत्त्वाच्या सूचना केल्या. बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून रुग्णांशी संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *