BLO घरी आला नाही तर थेट तक्रार करा! सोलापूरकर नागरिकांना प्रशासनाचे जाहीर आवाहन

​सोलापूर – विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहिमेंतर्गत शहरात सध्या मतदारांना गणना प्रपत्र (एन्युमरेशन फॉर्म) वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, काही भागांत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) निवडणूक आयोगाच्या नियमांना हरताळ फासत घरोघरी जाण्याऐवजी एकाच ठिकाणी बसून नागरिकांना बोलावून घेत असल्याच्या गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, “बीएलओने नागरिकांच्या घरापर्यंतच गेले पाहिजे, जागेवर बसून फॉर्म वाटप खपवून घेतले जाणार नाही,” असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.​या हलगर्जीपणामुळे माहिती नसलेले अनेक नागरिक मतदार नोंदणी आणि दुरुस्तीच्या या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत होती.

निवडणूक आयोगाचे स्पष्ट नियम काय सांगतात?-

​निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रत्येक ‘बीएलओ’वर खालील जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक मतदाराच्या घरी प्रत्यक्ष जाणे.नागरिकांना गणना प्रपत्र (Enumeration Form) देणे आणि त्यातील माहिती समजावून सांगणे.नागरिकांकडून योग्य माहितीसह भरलेले प्रपत्र जागेवरच स्वीकारणे.

एका जागी बसून फॉर्म वाटण्याचे आदेश नाहीत!”-

याबाबत सोलापूरचे प्रांत अधिकारी सदाशिव पडदुणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रशासकीय भूमिका स्पष्ट केली. “प्रत्येक बीएलओने घरोघरी जाऊनच प्रपत्र वितरित करणे आणि ते भरून घेणे बंधनकारक आहे. एका ठिकाणी कट्टा किंवा ऑफिस थाटून बसणे, अथवा कॅम्प घेण्याचे कोणतेही निर्देश निवडणूक आयोगाने दिलेले नाहीत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल,” असे पडदुणे यांनी सांगितले.

बीएलओ घरी आला नाही तर थेट तक्रार करा!-

​प्रशासनाने सोलापूरकर नागरिकांना आवाहन केले आहे की, जर तुमच्या भागातील बीएलओ घरात येऊन फॉर्म देत नसेल किंवा एकाच ठिकाणी बसून लोकांना चकरा मारायला लावत असेल, तर नागरिकांनी गप्प न बसता तातडीने प्रशासनाकडे तक्रार करावी. अशा कामचुकार अधिकाऱ्यांची गंभीर दखल घेतली जाईल.

प्रशासनाचे ‘फील्ड’वर लक्ष; एआरओ करणार तपासणी-

​बीएलओ केवळ कागदावरच काम दाखवत आहेत की प्रत्यक्ष मैदानात उतरलेत, यावर लक्ष ठेवण्यासाठी ‘सुपरव्हिजन’ वाढवण्यात आले आहे. सहायक निवडणूक नोंदणी अधिकारी (ARO) आता स्वतः सोलापूरच्या विविध भागात प्रत्यक्ष फिरून पडताळणी करत आहेत. बीएलओ घरोघरी भेटी देत आहेत का, फॉर्म योग्य पद्धतीने भरून घेतले जात आहेत का, यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची करडी नजर आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *