सोलापूर: राष्ट्रीय महामार्गावर कार अडवून, प्रवाशांच्या डोळ्यात तिखट मिरची पावडर फेकून आणि गळ्याला चाकू लावून जबरी चोरी करणाऱ्या ३ सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात सोलापूर शहर गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून २७ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या ३ अंगठ्या, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, चाकू, मिरची पावडर, मोबाईल आणि फिर्यादीच्या कारची चावी असा एकूण ४ लाख ३५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विजापूर रोडवरील थरार-
कर्नाटक राज्यातील बिदर येथील रहिवासी मल्लिकार्जुन कोणी आणि शांतकुमार येडवे हे २ जुलै २०२६ रोजी विजापूर येथे एका लग्नाचा कार्यक्रम आटोपून कारने हुमनाबादकडे निघाले होते. विजापूर रोडवरील एका हॉटेलजवळ आल्यानंतर आरोपींनी रिक्षा आडवी लावून त्यांची कार थांबवली.रिक्षामधून उतरलेल्या तिघांपैकी एकाने कारमधील प्रवाशांच्या डोळ्यात थेट तिखट चटणी फेकली, तर दुसऱ्याने गळ्याला चाकू लावून जबर मारहाण केली. या हल्ल्याने प्रवासी भांबावून गेले असता, आरोपींनी त्यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या आणि कारची चावी जबरदस्तीने हिसकावून घेत घटनास्थळावरून पोबारा केला होता. या धक्कादायक प्रकारानंतर विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून पडला दरोडा-
या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस उपायुक्त प्रीतम यावलकर, आणि उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक करत होते.७ जुलै रोजी सहायक पोलिस निरीक्षक शंकर धायगुडे आणि भरत चंदनशिव यांच्या तपास पथकाला गुप्त बातमीदारामार्फत एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. चोरी केलेले सोने विकण्याच्या उद्देशाने ३ संशयित तरुण छत्रपती संभाजी महाराज तलावाजवळील झाशीची राणी पुतळ्याजवळील मोकळ्या मैदानात रिक्षासह थांबले आहेत, अशी ती माहिती होती.
पोलिसांनी रचला सापळा-
माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने सदर परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिन्ही सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी घेराव घालून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी विजापूर रोडवरील जबरी चोरीची कबुली दिली. पोलिसांकडून आता या टोळीने आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा अधिक तपास सुरू आहे.














Leave a Reply