बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटली शासकीय नोकरी; सोलापूर सिव्हील हॉस्पिटलच्या अधिष्ठात्यांची पोलिसांत फिर्याद, गुन्हा दाखल

​सोलापूर – कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातून (सिव्हील हॉस्पिटल) दिव्यांगाचे बनावट प्रमाणपत्र मिळवून जलसंपदा (पाटबंधारे) विभागात शासकीय नोकरी लाटल्याचा एक धक्कादायक प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोलापूर सिव्हील हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांनी स्वतः सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, संशयित आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.​राजेश भाऊसाहेब जाधव (रा. नळेगाव, जि. अहिल्यानगर/अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव असून तो सध्या अहिल्यानगर पाटबंधारे विभागात कार्यरत आहे. हा सगळा गैरप्रकार ११ मे ते २० मे २०२६ या कालावधीत सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात घडला.

​आधी झाला अपात्र, मग रचला बनावटगिरीचा कट-

​पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी राजेश जाधव याला पाटबंधारे विभागात नोकरी मिळवण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्राची आवश्यकता होती. यासाठी त्याने सुरुवातीला जिल्हा शल्यचिकित्सक, अहिल्यानगर (अहमदनगर) यांच्याकडे रीतसर अर्ज केला होता. मात्र, तिथल्या वैद्यकीय तपासणीत तो अपात्र ठरला.
​अहिल्यानगरमध्ये अपात्र ठरल्यानंतर त्याने सोलापूर सिव्हील हॉस्पिटल गाठले. तिथे युनिक डिसेबिलिटी आयडी (UDID) या ऑनलाईन प्रक्रियेद्वारे नवीन अर्ज सादर केला. सोलापूरचा पत्ता दाखवण्यासाठी त्याने ‘सिद्धार्थ हौसिंग सोसायटी’ असा बनावट पत्ता असलेले खोटे ओळखपत्र (आधार कार्ड) अर्जासोबत जोडले.

​हॉस्पिटलमध्ये नोंद नाही, तपासणी नाही; थेट ४५% अपंगत्वाचे प्रमाणपत्र!-

​ऑनलाईन अर्जानंतर नियमानुसार सिव्हील हॉस्पिटलमधील कान-नाक-घसा (ENT) तज्ज्ञांकडून त्याची प्रत्यक्ष वैद्यकीय तपासणी होणे बंधनकारक होते. मात्र, जाधव याने अशी कोणतीही तपासणी करून घेतली नाही. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण (OPD) विभागात किंवा संबंधित डॉक्टरांकडे त्याची कोणतीही नोंद नसताना, सिस्टीममध्ये फेरफार करून त्याने थेट ४५% अपंगत्व असल्याचे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले.

​शासनाची आर्थिक फसवणूक-

​हे बोगस प्रमाणपत्र पूर्णपणे खरे असल्याचे भासवून राजेश जाधव याने अहिल्यानगर पाटबंधारे विभागात शासकीय नोकरी मिळवली. याद्वारे त्याने शासकीय वेतन व इतर सवलतींचा गैरफायदा घेत शासनाचा मोठा आर्थिक लाभ लाटला आणि शासनाची फसवणूक केली.​हा प्रकार रुग्णालयाच्या प्रशासकीय पडताळणीत उघडकीस आल्यानंतर सिव्हील हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांनी तातडीने पावले उचलत सदर बझार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी बनावट कागदपत्रे तयार करणे आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *