करमाळा – किडनीचा आजार बरा करण्याचे आमिष दाखवून आणि अघोरी पूजेच्या नावाखाली एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी कुप्रसिद्ध भोंदूबाबा मनोहर भोसले याच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून मनोहर भोसले, त्याचा साथीदार नाथबाबा ऊर्फ विशाल शहाजी वाघमारे आणि एका अनोळखी चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. मनोहर भोसलेविरुद्ध दाखल झालेला हा तब्बल सहावा गुन्हा आहे.
१ लाख ६४ हजारांची फसवणूक आणि अत्याचार-
मिळालेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये पीडित महिलेच्या बहिणीच्या पतीला किडनीचा गंभीर आजार होता. मनोहरमामा हा आजार बरा करतो, अशी माहिती मिळाल्यामुळे पीडित महिला करमाळा तालुक्यातील घोटी येथील मनोहर भोसले याच्या आश्रमात आली होती.भोसलेची भेट घेण्यासाठी सुरुवातीला ११ हजार रुपयांची पावती फाडण्यात आली. त्यानंतर त्याने एका पांढऱ्या रंगाची पावडर देऊन ती रुग्णाला पाण्यातून व जेवणातून देण्यास सांगितले.आजार बरा करण्यासाठी भोंदूबाबाने प्रत्येक अमावास्येला ५१ हजार रुपयांची मागणी केली. पीडितेने आजवर एकूण १ लाख ६४ हजार रुपये भोंदूबाबाला दिले. मात्र, तरीही रुग्णाच्या प्रकृतीत काहीही फरक पडला नाही.
अमावास्येच्या मध्यरात्री ‘तो’ प्रकार-
दोन वर्षांपूर्वी एका अमावास्येच्या मध्यरात्री ‘होमहवन आणि शुद्धीकरण’ करायचे आहे, अशी बतावणी मनोहर भोसले याने केली. यादरम्यान पीडित महिलेला पिण्यासाठी एका ग्लासमध्ये पाणी देण्यात आले. ते पाणी पिताच महिला बेशुद्ध पडली. महिला शुद्धीवर आल्यानंतर भोंदू मनोहर भोसले याने तिच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले.
पोलिसांत गुन्हा दाखल-
या धक्कादायक प्रकारानंतर अखेर पीडित महिलेने हिंमत दाखवून पोलिसांत धाव घेतली. तिच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी १. मनोहर भोसले (मुख्य आरोपी) २. नाथबाबा ऊर्फ विशाल शहाजी वाघमारे ३. एक अनोळखी चालक या तिघांविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास करमाळा पोलीस करत असून, भोंदूबाबाच्या या कृत्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.














Leave a Reply