सोलापूर: शहरातील बसवेश्वर नगर, नई जिंदगी भागात झालेल्या एका मोठ्या घरफोडीचा छडा लावण्यात एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (DB) शाखेला मोठे यश आले आहे. पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासचक्रे फिरवून अवघ्या २४ तासांच्या आत दोन सराईत चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ६ लाख ३ हजार १८५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
उकाड्यामुळे दुसऱ्या घरात झोपायला गेले अन्…
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरीशंकर नागनाथ कोळी (वय ५५, रा. बसवेश्वर नगर, नई जिंदगी, सोलापूर) हे हमालीचे काम करतात. दि. ६ जुलै रोजी रात्री घरात प्रचंड उकाडा असल्याने ते नेहमीप्रमाणे आपल्या घराला कुलूप लावून जवळच असलेल्या दुसऱ्या घरात कुटुंबीयांसह झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि लोखंडी कपाटातील सुमारे ५,०३,१८५ रुपयांचे दागिने व रोकड चोरून नेली. फिर्यादी कोळी यांनी ७ जुलै रोजी सकाळी हा प्रकार पाहिल्यानंतर तातडीने एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
गोपनीय बातमीदार आणि सीसीटीव्ही फुटेज ठरले उपयुक्त –
घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उप-निरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांकडून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी शांतीनगरजवळील बसवारुढ मठ परिसरात सापळा रचला.
या सापळ्यात संशयित आरोपी जिबरान उर्फ शोएब युनूस शेख (वय २१, रा. रंगभवन रोड, सोलापूर) आणि प्रशांत नागेश खंडारे (वय १९, रा. केशव नगर, सोलापूर) हे दोघे पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी या घरफोडीची कबुली दिली.
६ लाखांचा मुद्देमाल जप्त –
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी चोरी गेलेले २८.९५ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३६४ ग्रॅम चांदीचे दागिने, २५,००० रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली १ लाख रुपये किमतीची मोटारसायकल व स्क्रू ड्रायव्हर असा एकूण ६,०३,१८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची यशस्वी कामगिरी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त प्रितम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता पाटील, पीएसआय अल्फाज शेख आणि त्यांच्या संपूर्ण डी.बी. पथकाने अत्यंत परिश्रमाने पार पाडली आहे.














Leave a Reply