मोहोळ: तालुक्यातील लांबोटी येथे एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याने अज्ञात कारणावरून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना गुरुवारी, ४ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे करे कुटुंबासह संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.सुरज रामचंद्र करे (वय २०) असे आत्महत्या केलेल्या तरुण विद्यार्थ्याचे नाव आहे.
नेमकी घटना काय?-
मिळालेल्या माहितीनुसार, लांबोटी येथील रहिवासी रामचंद्र दत्तात्रय करे हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा सुरज हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या (यांत्रिकी अभियांत्रिकी) द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वीच त्याची कॉलेजची परीक्षा संपली होती, त्यामुळे तो सुमारे दहा दिवसांपूर्वीच आपल्या गावी लांबोटी येथे आला होता.४ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सुरजच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे कुटुंबाच्या निदर्शनास आले. दरवाजा उघडल्यानंतर सुरजने खोलीतील स्लॅबच्या लोखंडी हुकाला गळफास घेतल्याचे उघडकीस आले. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पोलिसांत नोंद, तपास सुरू-
या दुर्दैवी घटनेची माहिती सुरजचे वडील रामचंद्र करे यांनी तातडीने मोहोळ पोलीस ठाण्यात दिली. प्राथमिक माहितीनुसार, सुरजने अज्ञात कारणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उपासे करत आहेत. एका होतकरू इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने असे अचानक पाऊल उचलल्याने लांबोटी गावात हळहळ व्यक्त होत आहे.










Leave a Reply